• Sun. Jun 1st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबागमध्ये देव देवस्कीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; चौघांविरोधात गुन्हा दाखल

ByEditor

May 30, 2025

अमुलकुमार जैन
अलिबाग :
काही दिवसापूर्वी मुलीचा प्रेमविवाह तोडण्यासाठी कल्याण येथील मांत्रिकाने मुलीच्या आई वडीलांना विहिरीत मंतरलेल्या विटा आणि ताबीज विहिरीत टाकण्यास सांगितल्याचा प्रकार मुरुड तालुक्यात घडला असल्याची घटना ताजी असतानाच अलिबागमध्ये जादूटोणा आणि देव देवस्कीच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या आरोपाखाली चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी तीन वेगवेगळ्या व्यक्तींकडून एकूण ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात महेश मोरे, अपूर्वा मोरे, मिहीर मांजरेकर (मिहीर मोरे) आणि सागर कुंड यांचा समावेश असून त्यांनी अडचणीत असलेल्या लोकांना जादूटोणा आणि देवदेवस्कीच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली. पोलिसांनी चौघांना अटक केली असून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिबाग शहरात अडकलेली रक्कम मिळवून देत भोंदूगिरी करणारे महेश योगेश्वर मोरे (वय ५३, रा. ठिकरुळ नाका, अलिबाग), मिहीर मांजरेकर उर्फ मिहिर मोरे (वय २४), सागर यंशवंत कुंड (वय ३४, रा. रविकिरण हॉटेलचे पाठिमागे चेंढरे-अलिबाग), अपुर्वा महेश मोरे (वय ५०, नगरपालिका शाळा, इस्त्राईल आळी, रा. ठिकरुळ नाका-अलिबाग) यांच्याविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात ४२ लाख ४ हजार रुपयांच्या रकमेसहित एक थार गाडी, एक जेसीबी अशी वाहने कडव यांच्यासह नितीन पाटील, विघ्नेश विलास सुर्वे यांच्याकडून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी गणेश जनार्दन कडव (पनवेल) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून नजिक असणाऱ्या कळंबोली येथील ठेकेदार गणेश कडव यांना सन २०२३ मध्ये युनिर्वसल सिव्हील क्राफ्ट प्रा. लि. ला मांडवा येथे लोढा कंपनीचे रोड आणि मुरूम भरावाचे काम मिळाल्याने कडव यांचे मांडवा तसेच अलिबागमध्ये येणे जाणे असायचे. त्यावेळी कडव यांचे मित्र नितीन पाटील हा देखील अलिबागमध्येच राहत असल्याने एकमेकांना भेटत असे. या दरम्यान कडव यांनी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ठेकेदारीची कामे केली होती, पण काम पूर्ण झाल्यावरही त्यांना वेळेवर पैसे मिळत नव्हते. अशा कोट्यवधी रुपयांच्या रक्कमा अडकून पडल्या असल्याने गणेश कडव हे त्रस्त झाले असल्याचे नितीन पाटील यांना सांगितले. नितीन पाटील यांनी जानेवारी २०२४ मध्ये त्याचे ओळखीचे महेश मोरे रा. ठिकरूळ नाका अलिबाग यांचे सोबत ओळख करून दिली व हे लोकांची अडलेली काम करून देतात असे सांगितले. त्यानंतर कडव हे नितीन पाटील समवेत अधुन मधुन वेळोवेळी कामाचे अडचणीचे संदर्भात महेश मोरे यांस भेटत असत.

त्यानंतर कडव यांनी भोंदूगिरी करणाऱ्या महेश मोरे याची जानेवारी २०२४ मध्ये महेश मोरे याच्या अलिबाग शहरातील ठिकरुळ नाका येथे असलेल्या त्याच्या आश्रमात भेट घेतली. यावेळी कडव यांनी कोट्यवधी रुपयांची बिले अडकून पडली असून पैसे मिळत नसल्याने आर्थिक परिस्थितीबरोबर झुंज द्यावी लागत असल्याची माहिती दिली व यातून सोडविण्यात यावे अशी मागणी केली. यावर मांत्रिक विचार मग्न होण्याचे नाटक करीत कडव यांच्याकडे पाहत बसला. रक्कम मिळवून देण्यासाठी मार्ग आहे का याची पाहणी करतो असे भ्रम निर्माण केला गेला. त्यानंतर सदर ठेकेदार कडव याला घरात असलेली देवशिला हिचेवर लोकांना उभे करुन पांढरा सुती धागा हातात घेऊन त्याचे तुकडे करुन तुटलेला धागा एकत्रित झाल्यास काम होईल असे सांगत त्यांनी विश्वास संपादित केला.

अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी एक यज्ञ करावा लागेल. सदर यज्ञ करताना अग्नी हा आपोआप प्रज्वलित होईल अन् त्यात असणाऱ्या अडचणी जळून खाक होतील व अडकलेले पैसे मिळतील असे मांत्रिकाने सांगत या यज्ञासाठी लाखों रुपयाची सामुग्री लागणार असल्याचे सांगितले. मात्र मांत्रिकाच्या वशीकरणात अडकलेल्या ठेकेदार कडव यांनी होकार देत काही रक्कम देत हा यज्ञ करण्याची तयारी करण्यास सांगितले. मात्र यज्ञ करून सुद्धा असलेली अडचण ही काही सुटली नाही. म्हणून ठेकेदार कडव हे परत मांत्रिक मोरे याच्याकडे आले व अडचण सुटली नसल्याची माहिती दिली. यावेळी मांत्रिक याने सांगितले की, तुमचे काम न होण्यासाठी तुमच्यावर कोणीतरी मोठ्या प्रकारची करणी केल्याने तुमच्या कामात बाधा येत आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या राहत असलेल्या निवासी कांचनगंगा नावाच्या वृक्षाचे खोड ठेवावे लागेल. यासाठी तब्बल चाळीस लाख रुपयांची मागणी केली असता ठेकेदार कडव यांनी असमर्थता दाखवली असता शेवटी तडजोड होत सात लाख रूपयांना देतो असे सांगून ते घेण्यास भाग पाडले व त्याची पुजा करण्यास सांगितले. सदरची रक्कम ७ लाख रुपये रोख स्वरूपात महेश मोरे यांचे राहते घरी मुलगा मिहीर यांचे हातात दिली व काचन गंगा वृक्षाचे खोड घरी घेवुन गेले.

एवढे करूनही अडकलेली बिले मिळत नाहीत म्हणुन महेश मोरे व त्याचे मुलांना कडव यांनी जाब विचारला असता त्यांनी दिनांक १८/०५/२०२५ रोजी कडव यांच्या घरी महेश मोरे, त्याची पत्नी अपुर्वा मोरे, मुलगा मिहीर मांजरेकर उर्फ मिहीर मोरे व सागर कुंड असे सर्वजण सायंकाळी ६.१३ वाजताचे सुमारास आले व माझ्याकडे दिलेले कांचन गंगा वृक्षाचे खोड हे तुमचे घरात खुप निगेटीव्हीटी आहे त्यामुळे तुमचे काम होत नाही तुम्हाला जालीम उपाय करावा लागेल असे सांगत खोड घेवुन निघुन गेले. यावरून कडव यांना मांत्रिकाकडून फसवणूक झाली आहे असा संशय बळावला.

सदर भोंदूगिरी करणारे आरोपी हे अलिबाग येथे दर गुरुवारी श्रीकृपा दत्त अन्नछत्र नावाच्या ट्रस्ट मार्फत गोरगरीबांसाठी अन्नछत्र चालविले जायचे. १ जून २०२४ पासून दिनांक २७ मे २०२५ पर्यंत हा फसवणुकीचा प्रकार सुरु होता. मांत्रिकाने यासाठी ठेकेदार गणेश कडव यांच्याकडून ३८ लाख ५० हजार रुपयाची रोख रक्कम तसेच नितीन पाटील यांच्याकडून १ लाख २९ हजार ,विघ्नेश विलास सुर्वे याच्याकडून २ लाख २५ हजार तसेच १ थार गाडी, १ जेसीबी अशी वाहने घेत त्यांची फसवणूक केली.

याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ ३(२) (३), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१४, ३५४, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

महेश योगेश्वर मोरे, अपुर्वा मोरे, मिहीर मांजरेकर उर्फ मिहीर मोरे व सागर कुंड यांना या प्रकरणी २८ मे २०२५ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मेपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. आज (दिनांक ३० मे) रोजी न्यायालयात हजर केले असता अपुर्वा मोरे हिला जामीन मिळाला असून इतर तिघांना 3 जून २०२५ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

महेश मोरे याने रत्नागिरी आणि चौल दत्त मंदिर येथेही काहीतरी गडबड केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अन्य काही लोकांचीही या मोरे नावाच्या भोंदूबाबाने फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांना आहे. 

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!