विनायक पाटील
पेण: पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे तरणखोप गावचे हद्दीत बांगलादेशी नागरिक असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याबाबत कायदेशीर कारवाई करणेबाबत पेण पोलीस निरीक्षक यांचेकडून सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार पेण पोलीस स्टेशन पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता सदर ठिकाणी दोन बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत असताना आढळून आले. त्यांचेकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री पटल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पेण तालुक्यातील तरणखोप गावचे हद्दीत जसिमोद्दीन अबुल कासिम काझी, (वय ४९ वर्ष, रा. मोहन सखाराम पाटील यांची चाळ, अमृत बेकरी जवळ, तरणखोप ता. पेण, जि. रायगड, मूळ रा. बगुरा,पो.अभयपूर, जिल्हा झेणाईदा, बांगलादेश) व लिली खातून खुरशीद अली, (वय 43 रा. मोहन सखाराम पाटील यांची चाळ, अमृत बेकरी जवळ, तरणखोप, मूळ रा. नवारोन, पो. जादोबपुर,बांगलादेश) आपली ओळख लपवून अनधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याची माहिती पेण पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पेण पोलिसांनी तरणखोप येथून या दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 101/2025 परकीय नागरिक अधिनियम 1946 चे कलम 14 सह परकीय नागरिक आदेश 1948 नियम 3(1) सह पारपत्र (भारतात प्रवेश)नियम 1960 चा नियम 3,6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई रायगड पोलिस आधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे,, पेण उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या सूचनेनुसार पेण पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे, पोलिस हवालदार संतोष जाधव, प्रकाश कोकरे, सतीश पाटील, अजिंक्य म्हात्रे, भूपेश वेळे, महिला पोलिस हवालदार सुषमा भोईर, स्वरा पाटील, पोलिस नाईक अमोल म्हात्रे, पोलिस शिपाई तलवारे यांनी केली. सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करीत आहेत.