घन:श्याम कडू
उरण : “पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरू नका” असा मोठमोठ्या अक्षरात फलक झळकतो. पण त्याच फलकाखाली उभा असलेला पंप कर्मचारी मोबाईलमध्ये डोळे गाडून गोंधळलेल्या जगात हरवलेला! नियम सर्वसामान्यांसाठी आणि मोकळेपणाचा खेळ कर्मचाऱ्यांसाठी? उरण-बोकडविरा येथील एका पंपावर रविवारी घडलेली घटना म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ याच म्हणीची मूर्तिमंत प्रचिती देणारी!
पेट्रोलसारख्या अति ज्वलनशील पदार्थाच्या सान्निध्यात काम करताना एक चूकही जीव घेऊ शकते. पण त्याची तमा ना त्या पंप कर्मचारीला होती, ना तेथील व्यवस्थापनाला! मोबाईलवर चॅटिंग, व्हॉट्सअॅप, आणि कॉलमध्ये गर्क असलेल्या या कर्मचाऱ्यांचे फोटो काही सतर्क वाहनचालकांनी टिपले. फोटो काढले जात असताना सुद्धा मोबाईलमध्ये डोळे गाडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना काहीच फरक पडत नव्हता, म्हणजे निर्ढावलेपणाला सीमाच राहिली नाही!
पेट्रोल भरताना वाहन बंद करणे, खाली उतरून थोडे बाजूला उभे राहणे, गॅसवरील वाहनांसाठी अतिरिक्त खबरदारी हे सारे नियम जाहीरपणे लिहिलेले असले तरी प्रत्यक्षात पाळले जातात का? आणि पाळणाऱ्यांचे लक्ष ठेवणारे कोण? अपघात घडल्यावर जबाबदारी कोणाची, संबंधित पंपचालकांची, की या नियमांची अंमलबजावणी करायला झोपलेली शासकीय यंत्रणा?
मोबाईल फोनमधून दिसणारे न दिसणारे इलेक्ट्रॉनिक स्पार्क्स हे पेट्रोलच्या वायूसोबत संपर्कात आल्यास स्फोट होऊ शकतो हे शास्त्रीय सत्य पंप कर्मचाऱ्यांना माहिती नसावे का? की माहिती असूनही बेजबाबदार वर्तन करण्याची परवानगीच या यंत्रणांनी त्यांना दिली आहे? कायद्याच्या नावाने बोंब, कारण कायदे केवळ नागरिकांसाठीच लागू. कर्मचारी, चालक, पंपमालक आणि निरीक्षक यांच्या कारभाराला मात्र मोकळीक! या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, इंधनाच्या कडेलोटाच्या टप्प्यावर आपण उभे आहोत.
वाहनचालकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर कोण कारवाई करणार? की प्रशासन एखादा स्फोट होईपर्यंत वाट पाहत बसणार? हे पाहता आता ‘ब्र’ज्ञान सांगणाऱ्यांना जागवण्याची वेळ आली आहे. अन्यथा मोबाईलवरची एक ‘क्लिक’ अख्ख्या परिसराला उद्ध्वस्त करू शकते!