मुंबई: राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. सदर जिल्ह्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा अजून काही दिवस लांबणीवर पडली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये १४ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तापमान वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून मान्सूनचा प्रवास थांबला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनपर्यंत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे, पश्चिम किनारपट्टी वगळता इतर भागांतील तापमान वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तापमान अधिक राहील, असा अंदाज आहे. विदर्भात तापमान ४५ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा जास्त राहू शकते. मराठवाडा आणि खानदेशातही तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणी आणि लागवड करताना घाई न करण्याचे आवाहन केले आहे. कारण, १४ जूनपर्यंत राज्यात मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. दुपारनंतर काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात पावसाची शक्यता अधिक आहे. इतर भागांमध्ये तुरळक पाऊस पडू शकतो.
“कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये,” असे कृषी विभागाने म्हटले आहे.
