• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

क्रशर व्यावसायिकांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक

ByEditor

Jun 11, 2025

विनायक पाटील
पेण :
तालुक्यातील खाण मालक व क्रेशर धारक यांना गेल्या काही दिवसांपासुन शासकीय स्तरावरून खूप त्रास होत असल्याने तसेच अनेक प्रकारचे अडथळे पार करून व्यवसाय करत असताना त्यातही शासकीय बाबी पूर्ण असताना तसेच स्वामित्व धनाची (रॉयल्टी) पूर्तता केली असताना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याने पेण तालुक्यातील क्रशर व्यावसायिकांनी युवा नेते तथा व्यावसायिक वैकुंठ पाटील यांच्या पुढाकाराने एकत्र येऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बरोबर बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.

महायुतीचे रायगड खासदार सुनील तटकरे यांनी तातडीने क्रशर व्यावसायिक यांच्या समस्यांची दखल घेऊन महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ घेवुन बैठक लावली व बैठकीमधील सारांश घेवुन महसुल मंत्री बावनकुळे यांनी तातडीने रायगड जिल्हाधिकारी यांना शासकीय बाबींची पूर्णता करुन सहकार्य करावे असे सांगितले असल्याने पेण तालुका क्रशर व खाण मालकांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व खासदार सुनील तटकरे हे क्रशर व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी पेण तालुका क्रशर संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने आभार मानले तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचेही विशेष आभार पेण क्रशर युनियन अध्यक्ष अशोक भगत व व्यावसायिकांनी मानले.

या बैठकीत क्रशर व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते आणि त्यांनी आपल्या विविध अडचणी व प्रश्न सुस्पष्टपणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार सुनील तटकरेंपुढे मांडल्या आहेत आणि त्यांनी ठामपणे अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले असल्याचे युवा नेते तसेच व्यावसायिक वैकुंठ पाटील यांनी माहिती देताना सांगितले.

तक्रारी टाळा – सहकार्य वाढवा

कोणाचीही तक्रार माझ्यापर्यंत पोहोचता कामा नये. व्यवसायातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सर्वांशी समन्वय आणि सहकार्य ठेवा असे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बैठकीतील ठळक मुद्दे:

मक्तेदारी बंद करण्याचा स्पष्ट आदेश:

“स्वराज” सारख्या मक्तेदारी पद्धतीत काम करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करून त्यांचे कामकाज त्वरित बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

स्वतंत्र व्यावसायिकांना प्राधान्य:

स्वतंत्रपणे उद्योग करणाऱ्यांना संधी आणि प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला.

पनवेल व पेण क्रशर युनियनच्या प्रश्नांवर तत्काळ बैठक:

पुढील २ दिवसांत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन देण्यात आले.

प्रशासन व सरकारच्या प्रतिमेची काळजी:

कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार सरकार किंवा अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणार नाही, याची स्पष्ट सूचना देण्यात आली.

तत्काळ SOP (Standard Operating Procedure) तयार करा:

सर्व यंत्रणा एकत्र ठेवून, कार्यपद्धती ठरवून सुसंगत आणि पारदर्शक एसओपी लागू करण्यावर भर.

द्रोण प्रणालीद्वारे नियंत्रण:

क्रशर क्षेत्रावर द्रोण प्रणालीमार्फत संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या ठाम व स्पष्ट भूमिकेमुळे तसेच युवा नेते वैकुंठशेठ पाटील याच्या पुढाकाराने संपूर्ण क्रशर व्यावसायिकांमध्ये नवचैतन्य आणि विश्वास निर्माण झाला आहे. ही बैठक केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता, खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशासनाच्या स्वप्नाला मूर्त रूप देणारी ठरली आहे.
-अशोक पुंडलिक भगत,
अध्यक्ष पेण क्रशर युनियन.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!