• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण ते मंत्रालय मार्गावर एनएमएमटी बस सेवा सुरू करण्याची मागणी

ByEditor

Jun 11, 2025

विठ्ठल ममताबादे
उरण :
औद्योगिकदृष्ट्या उरण तालुका झपाट्याने विकसित होत असून उरणमधून बाहेर व बाहेरून उरणमध्ये येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, वेगाने विकास होणाऱ्या उरण तालुक्यात प्रवासाच्या बाबतीत योग्य ते सोयी सुविधा नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. उरणमधून जास्तीत जास्त प्रवासासाठी वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर उरण ते मंत्रालय बस सुरु करण्याची मागणी उरण आलाईव्ह ग्रुपच्यावतीने करण्यात आली आहे. अटलसेतु सागरी महामार्गामुळे उरण आणि मुंबईमधील अंतर कमी झाले आहे. त्यामुळे नेरुळ ते मंत्रालयप्रमाणे उरण ते मंत्रालय या मार्गावरही एनएमएमटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे ‘उरण अलाईव्ह ग्रुप’ यांच्यावतीने करण्यात आली आहे. ज्यामुळे उरणकरांना मंत्रालयाशी थेट संपर्क करण्यास सोपे जाणार आहे. तर या मार्गीकेमुळे मुंबईच्या इतर भागात जाणेही सोईचे होणार आहे.

नवी मुंबईला लागून असलेला उरण तालुक्यात अनेक मोठ मोठे प्रकल्प, कंपन्या आहेत. त्यामुळे येथे प्रवाशी मोठया प्रमाणात प्रवास करत असतात. उरणमधील नागरिक नोकरी व्यवसाय धंद्यानिमित्त उरण तालुक्यात तसेच उरण तालुक्याबाहेर मोठ्या प्रमाणात जातात. उरण परिसर हा नवी मुंबईच्या विकासाचा एक भाग आहे. तर मुंबई येथील मंत्रालय आणि दक्षिण मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासांची संख्या मोठी आहे. उरण ते मुंबई प्रवासाकरिता मोरा-मुंबई व जेएनपीए-मुंबई अशा दोन जलसेवा आहेत. मात्र, या जलसेवा अनेकदा खंडित होण्याच्या घटना बळावल्या आहेत. याचा त्रास नित्यनेमाने मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना करावा लागत आहे. तर दुसरीकडे नेरुळ ते मंत्रालय दरम्यानच्या सेवेचा लाभ उरणमधील प्रवासी उलवे येथे जाऊन घेत आहेत. यामुळे मंत्रालय सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास उरणच्या प्रवाशांना उलवे येथे जावे लागते. अटलसेतु हा उरणला जोडणारा असल्याने या महामार्गावरून उरण ते मंत्रालय दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेची एनएमएमटी बस सेवा सुरु करण्याची मागणी ‘उरण अलाईव्ह ग्रुप’ कडून करण्यात आली आहे. यामुळे, उरणमधील नागरिकांना कमी वेळात मुंबई गाठता येऊ शकते.

दळणवळणाच्या सेवा सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नाहीत. त्यामुळे प्रवाशी वर्गांला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उरण ते दादर दरम्यान अनेक वर्षे एसटी बस सेवा सुरू होती. मात्र, या बस संख्येत घट झाली आहे. त्यामुळे उरण ते मुंबई या मार्गने नागरिकांना बसने प्रवास करणे त्रासदायक बनले आहे. तर एनएमएमटीने नेरुळ ते उलवे नोड मार्गे मंत्रालय अशी बस सेवा सुरू केली आहे. अशाच प्रकारे उरण ते मुंबई (सीएसटी, मंत्रालय) पर्यंत जाणारी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन नवीमुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांना देण्यात आले आहे. उरण ते मंत्रालय या मार्गावर लवकरच बस सेवा सुरु होईल अशी आशा नागरिकांना आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!