उरण तालुक्यातील न्हावे गावावर शोककळा
घन:श्याम कडू
उरण : आभाळाला गवसणी घालणाऱ्या लेकराचं स्वप्न आकाशातच कोसळलं! अहमदाबादहून लंडनकडे झेपावलेलं एअर इंडियाचं विमान गुरुवारी दुपारी दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात न्हावा गावच्या मैथिली मोरेश्वर पाटील (वय २३) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून सेवेत असलेल्या या तरुणीच्या जाण्याने संपूर्ण कोकण हळहळला आहे.
गुरुवारी सकाळीच आई-वडिलांचा निरोप घेत, “लवकरच फोन करते” असं सांगून मुंबईमार्गे अहमदाबादकडे रवाना झालेली मैथिली आता कधीच परत येणार नाही, याची कुणालाही कल्पना नव्हती. लंडनकडे जाणाऱ्या विमानात तिची ड्युटी होती आणि तेच तिचं अखेरच उड्डाणं ठरलं.
दुपारी १२ क्रू मेंबर्स व २४२ प्रवाशांसह उड्डाण केलेलं विमान काही वेळातच रहिवासी भागावर कोसळलं. दुर्घटनेनंतर काही क्षणांतच आगीच्या भक्ष्यस्थानी सगळं विमान गेलं. यात मैथिलीचाही आगीत होरपळून अंत झाला. अपघाताची बातमी मिळताच न्हाव्याच्या पाटील कुटुंबावर आभाळ कोसळलं. वडील, आई आणि मामा तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले. निकटवर्तीय जितेंद्र म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली.
स्वप्नांना पंख देणाऱ्या एका गावकुसातल्या मुलीचा प्रवास इतक्या भयावहरीत्या संपेल, याचा विचार करूनच न्हावा गाव हादरून गेलं आहे. एक हसरी, उमदी, मेहनती मुलगी आता फक्त आठवणीत राहिली आहे.
