अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलिस ठाण्यात घडलेल्या फसवणूक प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या अलिबाग पोलिस ठाण्याचे तत्कालीन हवालदार हनुमंत सूर्यवंशी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, २१ जुलै २०२५ पर्यंत सूर्यवंशी यांना अटक करण्यात येणार नाही.
ही फसवणूक ४ फेब्रुवारी रोजी अलिबाग-वडखळ रस्त्यावरील तिनविरा धरणाजवळ घडली होती. तब्बल १.५ कोटी रुपयांची रक्कम हडप झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी समाधान पिंजारी हा स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या बंगल्यावर काम करत होता. आमदारांच्या सूचनेनुसार पिंजारीने ५ फेब्रुवारीला अलिबाग पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक किशोर साळे यांची भेट घेतली.
त्यावेळी हवालदार सूर्यवंशीही कागदपत्र घेऊन पोलिस निरीक्षक साळे यांच्याकडे आले होते. साळे यांनी पिंजारीची मदत करण्याचे निर्देश दिले होते. सूर्यवंशी यांनी पिंजारीकडून माहिती घेतल्यावर त्यांनी नामदेव हुलगे यांच्याशी संपर्क साधून, पोलिस ठाण्यात हजर राहण्याची सूचना दिली होती. हजर न राहिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी सूचना त्यांनी केली होती. याची नोंदही रजिस्टरमध्ये करण्यात आली होती.
तथापि, नंतर सूर्यवंशी यांनी अधिक चौकशी करून ६ फेब्रुवारी रोजी पिंजारीला लेखी नोटीस दिली व चौकशीसाठी बोलावले. पिंजारीने ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी पोलिस ठाण्यात उपस्थित राहून जबाब दिला. सूर्यवंशी यांनी कोणतीही बेकायदेशीर कृती केली नसल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले. सरकारी वकिलांनी यावर सहमती दर्शवून सांगितले की, तपास सुरू असला तरी २१ जुलैपर्यंत अटक केली जाणार नाही.
न्यायालयाने आरोपीला १, २, ३ जुलै रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले असून, तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही दिले आहेत.