स्थानिकांना प्राधान्य देण्याचे लेखी आश्वासन
अनंत नारंगीकर
उरण : न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल (NSFT) आणि जे. एम. बक्षी & सीएमए टर्मिनल्स यांच्याकडून इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली गुजरातमधील नोकर भरतीची जाहिरात रद्द करण्यात आली आहे. यापुढे केवळ स्थानिक वृत्तपत्रांतूनच नोकर भरतीसंदर्भातील जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील आणि मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे लेखी आश्वासन जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

गुजरातमध्ये भरती, महाराष्ट्रात काम — अन्यायकारक धोरणाला विरोध
सदर बंदर कंपनीने काही दिवसांपूर्वी भरतीसाठी इंग्रजी वृत्तपत्रांतून जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे, कामाचे ठिकाण उरण (JNPT) असतानाही मुलाखती गुजरातच्या मुद्रा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या अन्यायकारक व्यवस्थेविरोधात मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व उरण तालुकाध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांनी आवाज उठवला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांतून या मुद्द्यावर रोखठोक भूमिका घेतली.
बंदर प्रशासनाची तत्काळ दखल; मनसेचा प्रभावी हस्तक्षेप
२७ जून रोजी जेएनपीटी बंदर प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत मनसेचे नेते अविनाश जाधव, सरचिटणीस संजय नाईक, सरचिटणीस संदीप दळवी यांच्यासह प्रतिनिधीमंडळाने उन्मेष वाघ यांच्यासमोर मराठी युवकांवरील अन्यायाचा मुद्दा ठामपणे मांडला. त्यानंतर बंदर प्रशासनाने संबंधित जाहिरात रद्द केल्याचे घोषित करून स्थानीय युवकांना न्याय मिळेल, असा आश्वासक पवित्रा घेतला.
स्थानीय हक्कांसाठी संघर्षाचा विजय — मनसेची ठाम भूमिका
या निर्णयानंतर मनसेकडून प्रतिक्रिया देताना “हा विजय फक्त जाहिरात रद्दीकरणाचा नसून, राज ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे,” असे मत नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले. मराठी युवकांसाठी नोकरीच्या संधी सुरक्षित करणं हे पक्षाचं प्रमुख ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मान्यवर व यंत्रणांची उपस्थिती
या बैठकीला विविध स्तरांवरील मान्यवरांची उपस्थिती होती. त्यामध्ये जेएम बक्षी पोर्टचे अनिरुद्ध लेले, बीएमसीटी चे मनोज गावंड, बंदर अधिकारी मनिषा जाधव, ट्रस्टी दिनेश पाटील, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अँड. सत्यवान भगत, महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार, प्रविण दळवी, मनसे प्रवक्ते योगेश चिले, उपजिल्हा अध्यक्ष दिपक कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल आणि न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापू तुळशीराम ओवे, तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे, उरण शहर महिला अध्यक्ष सुप्रिया सरफरे, उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील, विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, जनहित पक्षाच्या मालती म्हात्रे, शेवा शाखाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे आदिंसह पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मनसेचे अनेक पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते.