वैभव कळस
म्हसळा : येथील रफी घरटकर यांनी काँग्रेस पक्ष सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाची कास धरत घर वापसी केली आहे. त्यांचेसह शहरातील अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्णयाचा जल्लोष साजरा करत असतानाच म्हसळा शहरात काँग्रेसला खिंडार पडले आहे. म्हसळा काँग्रेसमधील आघाडीवर असणारे काँग्रेस पक्षाचे माजी म्हसळा शहर अध्यक्ष रफी घरटकर ज्यांनी काँग्रेस पक्षाला म्हसळा शहरात बऱ्यापैकी उभारी देण्यात यश मिळविले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या शिवाय शहराचा विकास अशक्य असल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी शहर अध्यक्ष रफी घरटकर यांच्या समवेत काँग्रेसचे माजी सरपंच जहूर हुर्जुक यांचे खंदे समर्थक इर्शाद धायरेकर, खालिद काझी आणि सुहेल कोठीवले या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी सभापती नाझीम हसवारे यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शासकीय निवास्थानी प्रवेश केला.
पक्ष प्रवेश करताना राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष नाजीमभाई हसवारे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, शहर अध्यक्ष रियाज घराडे, नदीम दळवी, परवेज घरटकर, शाहिद उकये आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांचे खासदार तटकरे यांनी गळ्यात पक्षाची शाल घालुन स्वागत केले. यावेळी अल्पसंख्यांक समाज हा नेहमी खासदार सुनील तटकरे यांचा समर्थक असल्याची ग्वाही माजी सभापती नाजीम हसवारे यांनी दिली.