विश्वास निकम
कोलाड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कोलाड येथील आंबेवाडी नाक्यावर ‘द. ग. तटकरे चौक’ परिसरात मोठ्या आकाराचा खड्डा पडल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांचे जीवन धोक्यात आले आहे. जवळपास दोन फूट खोल आणि आठ फूट रुंद असलेल्या या खड्ड्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला आहे.
पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्याने तो दिसत नाही, परिणामी दुचाकीस्वार त्यात घसरत आहेत आणि वाहनांचे नुकसानही होत आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या — या वादामुळे रस्त्याच्या दुरुस्तीस विलंब होत आहे, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
या खड्ड्यामुळे केवळ कोलाडच नव्हे, तर नागोठणे, तळवली, भिरा फाटा, तसेच माणगाव व अलिबागकडील वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः, रोहा व धाटाव एमआयडीसी क्षेत्रात जाणाऱ्या अवजड वाहनांचा प्रवास या मार्गानेच होतो. त्यातच शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांचीही नियमित ये-जा असल्याने धोका अधिक वाढला आहे.
या मार्गावरील सेवा रस्ते व गटारे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. काही ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवरही पावसाच्या आगमनाने मोठे खड्डे पडले आहेत. रखडलेल्या कामांमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाकडून ठोस कृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
