अब्दुल सोगावकर
सोगाव-अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मांडवा पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेला भरदिवसा अश्लील धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम कारवाईने आरोपीला २४ तासांच्या आत अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
घटना कशी घडली?
१६ जून २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास, किहीम येथील आरसीएफ कॉलनीच्या रस्त्याने मोलमजुरीसाठी चालत निघालेल्या महिलेला एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरून (एमएच ०६ बीटी ३१५७) पाठलाग करत रस्त्यात अडवले. त्या व्यक्तीने महिलेला “माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला ठार मारेन” अशी धमकी देत तिची विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने ठाम नकार दिल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेला.
पोलिसांची वेगवान कारवाई
त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता महिलेने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस हवालदार श्री. शिद यांनी त्वरीत कारवाई करत संबंधित आरोपीविरुद्ध कलम ७४(२), ७८, ७९, ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला. महिला पोलीस हवालदार ए. व्ही. करावडे यांच्या तपासाअंती आरोपीचा शोध घेऊन परहुरपाडा, ता. अलिबाग येथून अटक करण्यात आली.
२४ तासांत दोषारोपपत्र सादर
पोलीस यंत्रणेने केवळ आरोपीला अटक करूनच थांबले नाही, तर २४ तासांच्या आत पूर्ण तपास करून दोषारोपपत्र तयार करत आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वीही मार्च २०२५ मध्ये कनकेश्वर मंदिर परिसरात अशाच प्रकारचा विनयभंग झाल्याच्या घटनेत मांडवा पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून न्याय मिळवून दिले होते. त्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी मांडवा पोलिसांचे अधिवेशनात विशेष कौतुक केले होते.
महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता, पोलीस यंत्रणेची सजगता आणि समाजातील संवेदनशीलता या मुद्यांवर चर्चा सुरू झाली आहे. घटनेनंतर स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली असून आरोपीविरुद्ध कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
