पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तक्का विभागातील स्वप्नालय मुलींच्या बालगृहाबाहेर दोन दिवसांचे नवजात बाळ बास्केटमध्ये ठेवलेले सापडले. बास्केटमध्ये दूध पावडर, बाटली, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी देखील होती, ज्यात बाळाच्या पालकांनी परिस्थितीवश त्याला अशा पद्धतीने सोडल्याबद्दल ‘माफ करा’ असे लिहिले होते.
ही घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांनी ही बाब तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि अल्पावधीतच बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात यश मिळवले.
प्रेमसंबंधातून जन्मलेले बाळ
पोलिस तपासात उघड झाले की, बाळाच्या आई-वडिलांचे लग्न झालेले नाही. प्रेमसंबंधातून जन्मलेले हे बाळ घरातील विरोधामुळे योग्य प्रकारे स्वीकारले गेले नाही. बाळाच्या आईला कुटुंबीयांनी भिवंडीतील तिच्या माहेरी राहण्यासाठी भाग पाडले होते. आठव्या महिन्यातच बाळाचा जन्म झाला आणि आर्थिक व सामाजिक अडचणींमुळे त्यांनी त्याला अनाथाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला.
चिठ्ठीतून उमटलेली वेदना
बाळासोबत सापडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते — “मी माझ्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही. माझी आर्थिक परिस्थिती व मानसिक अवस्था खूपच बिकट आहे. माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये म्हणून त्याची जबाबदारी घेण्यात यावी. भविष्यात शक्य झाल्यास बाळाला भेटण्यासाठी येईन. कृपया मला माफ करा.”
बाळ सुरक्षित; कायदेशीर प्रक्रीयेनंतर निर्णय
बाळ सध्या वात्सल्य ट्रस्ट या संस्थेत सुरक्षित आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित पालकांना ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी आता बाळाचा सांभाळ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सरकारी प्रक्रिया आणि कायदेशीर चौकशी पूर्ण झाल्यानंतर बाळ आई-वडिलांकडे देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक
पनवेल पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवलेली भूमिका याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेने अनाथ झालेल्या बाळांची अवस्था, पालकांची मानसिकता, आणि समाजातील असुरक्षितता याकडे लक्ष वेधले आहे.
