सामूहिक शेती आणि पूरक व्यवसायावर भर : डॉ. जीवन आरेकर
शशिकांत मोरे
धाटाव : हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोहा पंचायत समितीत आयोजित कृषीदिन कार्यक्रमास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात शेतीत विशेष योगदान देणाऱ्या कृतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तर शेतीतील नव्या दिशा आणि संधींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. जीवन आरेकर यांनी सांगितले की, “फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून राहून शाश्वत शेती शक्य नाही. आजच्या काळात सामूहिक शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि प्रक्रिया उद्योग यांसारख्या पूरक व्यवसायाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे.” आधुनिक शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण व सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कृतिशील शेतकऱ्यांचा सत्कार
या कार्यक्रमात गारभटच्या संगीता पवार, बाहेचे खेळू थिटे, बोरघरचे मेघेश भगत, नडवलीचे चंद्रकांत जाधव आणि निवीचे पत्रकार राजेंद्र जाधव यांना शेतीतील विशेष योगदानाबद्दल कृषिविभागाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी महादेव करे, व्हीआरटीचे सुशील रुळेकर, प्रशासन अधिकारी दिनेश वारगे, पशुवैद्यकीय अधिकारी प्रवीण धुमाळ, महिला व बालविकास अधिकारी शरयू शिंदे, तसेच स्वाध्याय फार्मरचे जितेंद्र जोशी व विविध शेतकरी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायत समितीचे कृषी अधिकारी रणजीत लवाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान उलगडून सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहितीही दिली. यावेळी काही शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीच्या माध्यमातून मिळवलेल्या यशोगाथा सांगत उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या शेवटी रत्नदीप चावरेकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी संस्थांचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.