शालेय शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
अब्दुल सोगावकर
सोगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधावा, यासाठी दी लाईफ फाउंडेशनने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय ठरला आहे. अलिबाग आणि सुधागड (पाली) तालुक्यातील सुमारे ८,७२० विद्यार्थ्यांना एकूण ४३,६८७ वह्यांचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम २५ आणि २६ जून २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडला.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पाठबळ
चोंढी (ता. अलिबाग) येथील दी लाईफ फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेचे “स्कूल चलो” अभियान शिक्षणात सक्रीय सहभागासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करत आहे. या मोहिमेअंतर्गत अलिबाग तालुक्यातील १६८ शाळांतील ५०७३ विद्यार्थ्यांना २५,३६५ वह्या आणि पाली (सुधागड) तालुक्यातील ३६४७ विद्यार्थ्यांना १८,३२२ वह्या वितरित करण्यात आल्या. वह्यांचे वितरण संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले.
मान्यवरांची उपस्थिती आणि संस्थेचे अभिनंदन
अलिबागमधील कार्यक्रमात जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याचा गौरव केला. सुधागड येथील कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण आणि गट विकास अधिकारी लता मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शान वाढवली. सर्वच मान्यवरांनी पूनम अजीत लालवाणी (संस्थेच्या विश्वस्त) आणि त्यांची टीम यांचे कौतुक करत शाळांशी भागीदारी वाढविण्याचे आवाहन केले.
भविष्यातील प्रशिक्षण कार्यक्रमांची घोषणा
पूनम लालवाणी यांनी शाळा प्रमुखांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व विकास व इंग्रजी अध्यापन पद्धतीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच राबवला जाईल, अशी घोषणा केली.
कार्यक्रम व्यवस्थापक शिलानंद इंगळे यांनी “स्कूल चलो” या संकल्पनेमागील प्रेरणा उलगडली. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रणय ओव्हाळ, प्रदीप डबले आणि राखी राणे यांचे विशेष योगदान लाभले.