विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेच्या तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी ही सभा झाली. तालुक्यातील युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत नुकतेच तालुका चिटणीसपदी निवड झालेले शिवराम महाबले, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य मारुती खांडेकर व विठ्ठल मोरे, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष रवींद्र झावरे, अमोल शिंगरे, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
प्रमुख मार्गदर्शक शंकरराव म्हसकर यांनी आपल्या भाषणात युवकांनी पक्षासाठी बांधिलकीने कार्य करावे, गावपातळीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नवी फळी तयार करावी व शेतकरी, कामगार आणि श्रमिकांच्या समस्यांवर सक्रियपणे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले.
“शेकाप हा कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देणारा पक्ष आहे. त्यामुळे युवकांनी जयंताभाई पाटील, सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे व महिला आघाडी नेत्या मानसीताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक ताकद उभी करावी,” असेही त्यांनी नमूद केले.
नवनिर्वाचित तालुका चिटणीस शिवराम महाबले यांनी युवकांची गरज आणि योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पक्षवाढीसाठी ग्रामीण व शहरी भागातील संवाद वाढवण्यावर भर दिला. जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य मारुती खांडेकर आणि विठ्ठल मोरे यांनीही युवकांना मार्गदर्शन करत प्रभावी प्रचार, जनसंपर्क आणि संघटन पातळीवर सुधारणा करण्याचे आवाहन केले. युवक सदस्य शिरीष महाबले यांनी, “पक्षाचे कार्यक्रम समाजमाध्यमांवर प्रभावीपणे पोहोचवले गेले पाहिजेत,” असे स्पष्ट मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वक्त्यांनी तालुक्यात पक्षनिष्ठा वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट मांडले. शेवटी सभेचे आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष संतोष दिवकर यांनी केले. युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि कार्यासाठी नवचेतना निर्माण करणारी ही सभा उत्साहात पार पडली.