अमूलकुमार जैन
रायगड : देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरणारा काशीद समुद्र किनारा पुन्हा एकदा दुर्घटनेमुळे चर्चेत आला आहे. पुण्यातील तनिष्क मल्होत्रा (वय २०, रा. हवेली, पुणे) हा तरुण पर्यटक मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काशीद समुद्रात बेपत्ता झाला. पोलीस आणि लाईफगार्ड यांचे बचावकार्य अद्याप सुरू आहे.
पुण्यात पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले तनिष्क मल्होत्रा आपल्या मित्रांसह मार्क मिल्टन, वरुण तिवारी आणि पुण्य पाटील यांच्यासह एक दिवसाच्या पर्यटनासाठी काशीदला आले होते. त्यावेळी समुद्रस्नान करण्यासाठी चौघेही समुद्रात उतरले. मात्र, खोल पाण्याची कल्पना नसल्यामुळे तनिष्क लाटांमध्ये दूर वाहून गेला आणि त्याचा थोड्याच वेळात संपर्क तुटला. सुदैवाने इतर तिघांना वाचवण्यात यश आले.
बेपत्ता तनिष्कचा शोध घेण्यासाठी काशीद येथील लाईफगार्ड, स्थानिक नागरिक आणि मुरुड पोलीस प्रयत्नशील आहेत. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी सागर पाठक यांच्या सूचनेनुसार रोहा येथील रेस्क्यू टीमचे सागर दहिमकर यांच्या नेतृत्वाखाली शोधकार्य सुरू झाले आहे.
पावसाळी हंगाम असूनही पर्यटकांची बेफिकिरी
मौसमी पावसामुळे किनारा आधीच बंद असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले असले तरी अनेक पर्यटक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत समुद्रात उतरतात. मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांना “पावसाळी हंगामात समुद्रात उतरणे टाळा,” असे आवाहन केले आहे.
संरक्षक यंत्रणेची गरज अधोरेखित
प्रत्येक वर्षी येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येनुसार काशीद येथे सुरक्षेसाठी कायमस्वरूपी स्पीड बोट तैनात करण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे. दुर्घटना टाळण्यासाठी किनाऱ्यावर आवश्यक साधनसामग्री आणि दक्षता पथक उपलब्ध असणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.