तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीची मागणी
अनंत नारंगीकर
उरण : उरण पंचायत समितीच्या कामकाजात गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, तत्कालीन गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांच्यावरील चौकशीसाठी तालुक्यातून मागणीचा सूर चढू लागला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी या कामकाजाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची सखोल तपासणी करावी, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे.

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर उरणच्या सर्वांगीण विकासाची धुरा वाठारकर यांच्याकडे होती. मात्र, माहितीच्या अधिकारात मिळालेल्या अहवालात शासकीय निधींच्या अपहाराची उदाहरणे स्पष्ट होत असून, त्यावर आधारित जोरदार टीका केली जात आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेत शिवसेना (उबाठा गट) चे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी याविरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांनी भर सभेत वाठारकर यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे गंभीर आरोप करत चौकशीसाठी आवाज उठवला.
या प्रकरणी अद्याप चौकशी सुरू झालेली नाही, ना विकासकामांचे मूल्यांकन. उलटपक्षी, वाठारकर यांची पनवेल पंचायत समितीमध्ये पदोन्नती झाल्यामुळे प्रशासकीय स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
टक्केवारीचा कारभार बळावतोय?
स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा रंगत आहे की, अशा कारभारामुळे उरण पंचायत समितीचे कार्यालय हे “टक्केवारीचे केंद्र” बनत चालले आहे. लोकशाही स्वच्छता राखण्यासाठी तातडीने निष्पक्ष व पारदर्शक चौकशी आवश्यक असल्याचे जनतेचे मत आहे.
