सलीम शेख
माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कशेणे गावात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ₹१,६६,००० किंमतीचा ऐवज चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी (३० जून) रात्री १२.३० च्या सुमारास गावातील रहिवासी रवींद्र सायगावकर यांच्या घरी ही घटना घडली. घरातील मंडळी पावसामुळे लवकर झोपले असताना, पाठीमागील दरवाजाची कडी तोडून अज्ञात दोघे चोरटे घरात शिरले आणि बेडरूमला बाहेरून कडी लावून लोखंडी कपाट फोडून रोकड ₹६,००० व सोन्याचे दागिने असा एकूण रुपये १ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला.
चोरीची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सध्या घटनास्थळाचे बारकाईने परीक्षण करण्यात येत असून, पोलीस तपास अधिक गतिमान केले आहेत. लवकरच या गुन्ह्याचा उलगडा करण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.