प्रतिनिधी
उरण : उरण तालुक्यातील कोप्रोली नाक्यावर मंगळवारी (दि. १) भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेशी गैरवर्तन झाल्याची घटना घडली. महिलेच्या आरोपानुसार, बाजारपेठेत भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याने अनुचित स्पर्श केल्याची माहिती तिने परिसरातील नागरिकांना दिली. यानंतर स्थानिकांनी संबंधित परप्रांतीय विक्रेत्यास जाब विचारल्यावर परिसरात तणाव निर्माण झाला आणि जमावाने संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीस चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. महिला व परिसरातील नागरिकांच्या तक्रारीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. संबंधितावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर कोप्रोलीसह परिसरातील काही गावांमध्ये बाहेरील राज्यांतील व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाविषयी चिंता व्यक्त केली जात असून, ग्रामपंचायतीकडून दुकानदारांचे व्यवहार सुसंगत व पारदर्शक ठेवण्यासाठी अधिक काटेकोर धोरण राबवावे, अशी मागणी केली जात आहे.