अमुलकुमार जैन
रायगड : मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनाऱ्यावर पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या वीस वर्षीय तनिष्क मल्होत्रा या तरुणाचा मृतदेह तब्बल ४३ तासांनंतर सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तनिष्क मल्होत्रा आणि त्याचे तीन मित्र मार्क मिल्टन, वरुण तिवारी व पुण्य पाटील हे चौघेही पुणे येथील पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी असून एकदिवसीय सहलीसाठी काशीद येथे आले होते. समुद्रस्नान करताना तनिष्क खोल पाण्यात गेला आणि लाटांमुळे तो वाहून गेला. शोध कार्यात तटरक्षक दल, लाईफ गार्ड, स्थानिक नागरिक, तसेच SVRSS रेस्क्यू टीम आणि मुरुड पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता.
शोधकार्य हेलिकॉप्टर व थर्मल ड्रोनच्या सहाय्याने ३ जुलै रोजी सकाळी सात वाजता सुरू झाले. सकाळी ७:४५ च्या सुमारास तनिष्कचा मृतदेह सापडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुरुड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
धोक्याची जाणीव
सध्या पावसाळी हवामानामुळे समुद्रकिनारा बंद करण्यात आलेला असूनही अनेक पर्यटक नियम झुगारून थेट पाण्यात उतरत आहेत. यामुळे अशा दुर्दैवी घटनांचा धोका अधिक वाढतो आहे.
प्रशासनाचे आवाहन
मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक विजय देशमुख यांनी पावसाळी हंगामात समुद्रात प्रवेश टाळण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक स्पीड बोट तैनात करण्याची मागणी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे करण्यात आली आहे.
| काशीद व मुरुड तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर आतापर्यंत अंदाजे १५० पर्यटकांचे मृत्यू झाले असून अनेकांचे जीव स्थानिक प्रशासन व बचाव दलांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. |
