नगरपालिकेचं दुर्लक्ष; रिक्षाचालक त्रस्त, स्थानिकांना त्रास
घनःश्याम कडू
उरण : वीर सावरकर मैदानासमोरील रिक्षा स्टँडजवळ परप्रांतीय हातगाडीवाल्यांनी रस्त्यावरील जागा बेकायदेशीररित्या अडवून व्यवसाय सुरू केला असून, त्यामुळे रिक्षाचालकांपासून स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या दादागिरीला खुलेआम पाठींबा मिळत असल्याचं चित्र आहे.

रिक्षाचालकांवर निर्बंध, पण हातगाड्यांना खुली मुभा?
स्थानिक वाहनधारकांकडून काही मिनिटं रस्त्यावर वाहन थांबवलं तरी रिक्षा युनियनकडून त्वरित हलवण्याचे आदेश दिले जातात. परंतु हातगाड्यांवर मात्र कुणीही कारवाई करत नाही, यामागे अंतर्गत ‘सेटिंग’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वसुली, पावत्यांची खुलेआम देवाणघेवाण
वर्षानुवर्षे नगरपालिकेचे विशिष्ट कर्मचारी हातगाडीवाल्यांकडून वसुली करत असल्याचे आरोप असून, हे भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण मानले जात आहे. त्यामुळे शहरवासीयांकडून संबंधित कर्मचाऱ्यांना हटवून नव्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी जोर धरत आहे.

परप्रांतीयांचा वाढता प्रभाव; स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता
शहरात परप्रांतीय हातगाडीवाल्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यांच्या बेकायदेशीर कब्जामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक हैराण झाले आहेत. नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहरभर चर्चेत आहे.
“रस्ते काय परप्रांतीयांच्या मालकीचे आहेत का?”
ही बेशिस्त, नागरिकांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरणारी व्यवस्था जर त्वरित हटवली नाही, तर उरणकर नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत.
