विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या कोलाड-तळवली विभागात ठेकेदारांकडून सुरू असलेलं काम स्थानिक ग्रामस्थांच्या मर्जीविरुद्ध व अर्धवट स्वरूपात सुरु असल्याने प्रचंड त्रास निर्माण झाला आहे. पादचारी पुलाखाली गुडघ्यापर्यंत पाणी साचतं, सेवा मार्गाचा ठावठिकाणा नाही, व भर पावसात पुन्हा खोदाई सुरु असल्यामुळे नागरिकांना ‘तारेवरची कसरत’ करावी लागत आहे.

ग्रामस्थांच्या समस्या दुर्लक्षित; अधिकार्यांचे आश्वासन हवेत
गेली अनेक वर्ष महामार्गाचं काम रखडलेलं आहे. मंत्री, आमदार, खासदारांनी वारंवार पाहण्या करूनही ठोस अंमलबजावणी न झाल्याचं चित्र आहे. विशेषतः तळवली परिसरात ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घरांची पाहणी करून ठेकेदारांना सूचना दिल्या होत्या, मात्र त्या आदेशांची अंमलबजावणी आजतागायत झाली नाही.
निकृष्ट दर्जाचे काम व नुकसान भरपाईचा अभाव
मागील ठेकेदाराने खोदकाम करताना मोठे ब्रेकर वापरल्यामुळे अनेक घरांना तडे गेले. त्याची नुकसान भरपाई न मिळाल्याने ग्रामस्थ आजही न्यायासाठी हेलपाटे घालत आहेत. पुलाखाली वाहनांचीही हालचाल अशक्य असून, गटार आणि डांबर रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत.
ग्रामस्थांच्या भावना: “ठेकेदार हुकूमत गाजवत आहे!”
घरमालक प्रफुल घावटे यांनी आरोप केला की, ठेकेदार पोलिस दलासोबत काम सुरू करून ग्रामस्थांवर अन्याय करत आहे. सरकार, ठेकेदार व संबंधित खात्याने त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत.
