रायगड : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांवरून सरकारला सवाल विचारताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी रायगड जिल्ह्यात एका दिवसात सहा बलात्कार झाल्याचा दावा करून खळबळ उडवली. विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने ‘शक्ती कायदा’ लागू न करण्यावर टीका केली.
मात्र, या दाव्याचे रायगड जिल्हा पोलिसांनी खंडन करत स्पष्ट केले की, असा कोणताही प्रकार एका दिवसात घडलेला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी वडेट्टीवार यांचा दावा फेटाळून लावत तो “पूर्णतः चुकीचा व दिशाभूल करणारा” असल्याचे सांगितले.
दलाल यांनी तळा तालुक्यातील एका आरोग्य शिबिरातील संदर्भ देताना माहिती दिली की, आदिवासी पाड्यावर काही किशोरी मुली गर्भवती असल्याचे आढळून आले होते. मात्र, या गर्भधारणांची कालमर्यादा वेगळी होती आणि संबंधित मुलींचे विवाह त्यांच्या जोडीदारांशी आधीच झाले होते.
तळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी संबंधित समाजाच्या इच्छेविरुद्ध सकारात्मक दृष्टिकोनातून हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे दलाल यांनी स्पष्ट केले. तसेच, “एका दिवसात सहा बलात्कार” ही माहिती चुकीची असून, कोणतीही अशी घटना घडली नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
