साध्या किट वापरून अविस्मरणीय यश; रायगडमधून प्रथम महिला शॉटगन नेमबाज ठरण्याचा अभिमान
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील दिघोडे गावातील अवनी अलंकार कोळी हिने आपल्या असामान्य खेळगतीने संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे. डबल ट्रॅप शॉटगन प्रकारातील नेमबाजीत तीची भारतीय संघात निवड झाली असून ती १४ ते २८ ऑगस्ट २०२५ दरम्यान कझागिस्तान येथे होणाऱ्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या या खेळात अवनीने ग्रामीण भागातील समज-अपसमज मोडून जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर अतुलनीय कामगिरी केली आहे. वडील अलंकार कोळी हे स्वतः राष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक असून त्यांनी आपल्या कन्येला शस्त्र हातात देत नेमबाजीच्या मार्गावर उभं केलं. अवनीच्या यशात आई कविता कोळी, भाऊ अर्णव यांचेही मोलाचे योगदान आहे.
अवनीने इंडियन मॉडेल स्कूल, उलवे आणि वीर वाजेकर कॉलेज, फुंडे येथे शिक्षण घेतलं आहे. वयाच्या १२ व्या वर्षी पिस्तूल शुटिंगला सुरुवात करून तिने राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. तिने छत्रपती स्टेडियम, बालेवाडी पुणे येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रालस्टोन कोयलो यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
अवनीच्या प्रेरणादायी प्रवासाबाबत गावाचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, IMS उलवेच्या मुख्याध्यापिका गौरी शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले असून तिचे यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक ठरत आहे.
