अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांवर डिझेल तस्करीचे जाळे उघडकीस येत असून, अलिबाग तालुक्यातील रेवस गावच्या पकटी परिसरात मांडवा पोलिसांनी डिझेल तस्करीचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता मांडवा पोलिसांनी रेवस खाडी परिसरात छापा टाकला. “समर्थ कृपा (निसर्ग दर्शन)” नावाच्या मच्छीमारी बोटीमध्ये ५,००० लिटर डिझेल साठा आढळून आला, ज्याची बाजारमूल्य अंदाजे ₹४,००,००० इतकी आहे. तसेच या बोटीवरील ₹१५,००० किंमतीची Honda कंपनीची डिझेल उपसा मोटार, ₹१५,००० किंमतीचा जनरेटर, ₹१०,००,००० किंमतीची आय.एन.डी.एम.एच.३ एमएम ५४६४ क्रमांकाची मच्छीमारी बोट म्हणजे एकूण ₹१४.३० लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईनंतर मांडवा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८७/२०२५ नुसार बीएनएस २८७, ३(५), अत्यावश्यक वस्तू कायदा कलम ३, ७, पेट्रोलियम अधिनियम कलम ३, २३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची फिर्याद हर्षल दिनकरराव देशमुख (वय ४८) पुरवठा अधिकारी अलिबाग यांनी दिली असून संशयित व्यक्तींमध्ये गणेश कोळी, विनायक कोळी, मोरेश्वर नाखवा यांचा समावेश आहे.
सागरी सुरक्षेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात, तरीही मांडवा, रेवदंडा व अन्य किनारी भागात डिझेल तस्करीची प्रकरणे वारंवार घडत आहेत. मालवाहू बोटी समुद्रात थांबून जहाजांमधील डिझेल लुटण्याची माहिती मिळत असून जहाज प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही संगनमत उघड झाले आहे. बळजबरीने डिझेल चोरीचे प्रकारही घडत आहेत.
पूर्वी महोम्मद अली आणि चांद मदार या डिझेल माफिया टोळ्यांचे वर्चस्व होते. चांदची हत्या झाल्यानंतर आणि महोम्मद अलीने माघार घेतल्यानंतर नव्या तस्करांनी डिझेलच्या काळाबाजारात घोडदौड सुरू केली आहे. उरण, बेलापूर, नवी मुंबईसह अलिबागमधील काही स्थानिक लोकप्रतिनिधी व मच्छीमार बांधव यांचेही तस्करीत हात असल्याचे बोलले जाते.
ही तस्करी समुद्र सुरक्षा धोक्यात आणते आहे. सागरी किनाऱ्यावर डिझेल बोटीमधून उतरवून गाड्यांद्वारे वितरण होते. पूर्वी रेवदंडा किनारी गणेश कोळी यांच्यावर खोपोली पोलिसांनीही कारवाई केली होती. मांडवा पोलीस ठाण्यात संशयितांवर यापूर्वीही गुन्हे नोंद आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवायांवर काही राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचेही बोलले जात असून, प्रशासनातील काही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचेही तक्रारी आहेत.
