प्रतिनिधी
नागोठणे : वाकण-पाली मार्गाला डांबरीकरण मिळून अवघे वर्ष झाले असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून अदृश्य होत असून, विशेषतः रात्रीच्या वेळेस वाहनचालक थेट खड्ड्यांत आपटत आहेत. दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बलाप गावाजवळ, तामसोली स्टॉप शेजारील मोठा खड्डा, तामसोली-राबगाव दरम्यान पडलेला खड्डा आणि पालीतील आंबा नदीवरील पूल हे विशेषतः धोकादायक ठिकाणे बनले आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत असून, खड्ड्यांची खोली ५ ते १० इंचांपर्यंत असल्याचे आढळले आहे. ठेकेदाराकडून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे यावरून स्पष्ट होते. पावसामध्ये या खड्ड्यांमुळे अधिकच धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “रात्रीच्या अपघातांना जबाबदार कोण?”, “ठेकेदारावर कारवाई होणार का?”, आणि “प्रशासन झोपेतून जागे होईल का?” अशा प्रश्नांनी नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.