घनःश्याम कडू
उरण : महाराष्ट्राच्या संत परंपरा व वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीचा उत्सव उरण तालुक्यात विविध ठिकाणी भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भेंडखळ, नागाव, पिरवाडी, जासई आणि उरण शहरात भाविकांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली.
भेंडखळ येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात ‘प्रति पंढरपूर’सारखा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासून अभिषेक, हरिपाठ, भजन, दिंडी, कीर्तन आणि कवी संमेलनाच्या कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिरसाने न्हालेला होता. फुलांनी सजलेली सजावट आणि भगव्या पताकांनी परिसर वारकरी परंपरेचं सजीव चित्र उभं करत होता.
नागावमध्ये मठीवर भजन आणि कीर्तनाचे आयोजन झाले, तर उरण शहरातील विविध मंदिरांमध्ये विशेष आरत्या, महाप्रसाद आणि भाविकांसाठी दर्शनाच्या खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. भाविकांची उत्साही उपस्थिती आणि त्यांच्या श्रद्धेने संपूर्ण तालुक्यात एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, “उरणमध्ये दरवर्षी आषाढी एकादशीचा उत्सव अधिक भक्तिभावाने साजरा होत असून, वारकरी संप्रदायातील श्रद्धा आणि परंपरा अधिक दृढ होत आहे.”
