• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोर्लई समुद्रात दिसली संशयित बोट; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ByEditor

Jul 7, 2025

अमुलकुमार जैन
रायगड :
काश्मीरमधील पहलगाम येथे २३ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर एक संशयित बोट दिसल्याने खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानच्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानसोबतचा करार तात्पुरता स्थगित केला आहे. त्याचबरोबर ऑपरेशन ‘सिंदूर’द्वारे कठोर प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

कोर्लई किनाऱ्यावर सुरक्षेचा अलर्ट

रेवदंडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आढळलेली बोट ही पाकिस्तानशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. समुद्र किनाऱ्यापासून तीन नॉटीकल मैलांवर ही बोट आढळून आली असून, रडार यंत्रणेच्या टप्प्यात आलेली असल्यामुळे ती संशयास्पद मानली जात आहे.

वादळी हवामानामुळे अडचण

वर्तमान वादळी परिस्थितीमुळे बोटीपर्यंत पोहोचण्यास अडथळा येत आहे. नौसेना व तटरक्षक दलाच्या मदतीने बोटीवर पोहोचण्याचे प्रयत्न सुरू असून, मुरुड तालुक्यातील साळाव येथून JSW कंपनीच्या बार्जद्वारे संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेमुळे स्थानिक नागरिक व मच्छीमार समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे व कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याच धर्तीवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेकी कसाब व त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश करत देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर हल्ला चढवला होता. त्या हल्ल्यात १६६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

सदर संशयित बोटीबाबत तपास सुरु असून, सुरक्षा यंत्रणा अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाने नागरिकांना शांतता व सावधगिरी राखण्याचे आवाहन केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!