अमुलकुमार जैन
रायगड : श्रीवर्धन तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायक विकास मनोहर बोंडले (वय ३४) याच्याविरोधात लाच मागणीचा गंभीर आरोप सिद्ध झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबईच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.
तक्रारदाराने दिनांक २४ जून २०२५ रोजी विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यात बोंडले यांनी प्रलंबित सातबारा नोंदीच्या कामासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप होता.
या तक्रारीच्या अनुषंगाने २६ जून रोजी पंचांसमक्ष सत्यता पडताळणी करण्यात आली. तपासात आरोपीने प्रत्यक्षरित्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वात पथकात पोलिस हवालदार पवार, गिरासे, नाईक व चालक गायकवाड यांनी सहभाग घेतला.
नागरिकांसाठी आवाहन
शासकीय कामांसाठी कोणतेही अधिकारी/कर्मचारी किंवा एजंट कायदेशीर शुल्काशिवाय अतिरिक्त रक्कम मागत असल्यास तत्काळ अँटी करप्शन ब्यूरो, ठाणे (दूरध्वनी – 022 – 2542 7979 / टोल फ्री – 1064) वर संपर्क साधावा.