अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यालगतच्या खोल समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा अलर्टवर आहेत. ही बोट पाकिस्तानची असण्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. तसेच या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा अंदाज असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
रात्री ही बोट सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर दिसली, मात्र काही वेळातच ती रडारच्या कक्षेच्या बाहेर गेली. त्यामुळे तिचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. सोमवारी सकाळपासून हेलिकॉप्टरद्वारे समुद्रात बोटीचा शोध सुरू आहे, कारण ती खोल समुद्रात गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस, तटरक्षक दल, नौदल, सीमा शुल्क विभाग, स्थानिक गुन्हे शाखा, शीघ्र प्रतिसाद दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक हे सर्व सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. रात्रीपासून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
ही बोट कोर्लईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नॉटिकल मैल अंतरावर आढळली होती. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि सुरक्षा यंत्रणा प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.