रायगड : कोर्लई किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. घटनास्थळी कोणतीही बोट प्रत्यक्षपणे न सापडल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला. मात्र नौदलाच्या रडारवर आढळलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षायंत्रणांनी शोधमोहीम राबवली.
प्राथमिक अंदाजानुसार ही बोट खोल समुद्रात असल्याचे सांगितले गेले. रायगड पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी तातडीने प्रतिसाद दिला. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने समुद्रात शोध घेण्यात आला. तपासादरम्यान ‘मुकद्दर बोया ९९’ नावाची पाकिस्तानी मासेमारी बोट रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. ही बोट वादळामुळे पाकिस्तानमधील कराचीकडून भारतीय जलसीमेत वाहून आल्याचा अंदाज नौदलाने वर्तवला.
मात्र प्रत्यक्षात रेवदंडा परिसरात आढळलेली वस्तू ही बोटीचा एक छोटा भाग होता.सबंधित बोट ही पाकिस्तानच्या कराचीमध्येच आहे. मासेमारी बोटीचा बोया असल्याने त्याला जीपीएस ट्रॅकर आहे. या ट्रॅकरमुळेच भारतीय नौदलाने बोटीची ओळख पटवली आहे. मात्र मूळ बोट पाकिस्तानात असून बोटीचा काही अवशेष भारतात वाहून आल्याचं निष्पन्न झालं आहे. खबरदारी म्हणून पोलिसानी रायगड जिल्हा पिंजून काढला मात्र काळजी करण्यासारखे कारण नाही, रायगड पोलिसांनी सांगितले आहे.
५२ अधिकारी आणि ६०० पोलिसांच्या टीमने जिल्हा पिंजून काढला. GPS ट्रॅकरच्या माध्यमातून बोटीची ओळख पटवली गेली आणि मूळ बोट पाकिस्तानात असल्याची खात्री झाली. नौदल व पोलिसांनी तपासाअंती स्पष्ट केले की सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने आवर्जून सांगितले.