• Mon. Jul 14th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या विलीनीकरणाच्या षडयंत्राविरोधात जोरदार लढा

ByEditor

Jul 7, 2025

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक बोर्ड बृहन्मुंबई-ठाणे बोर्डात विलिन करण्याचे षडयंत्र हाणून पडणार -महेंद्रशेठ घरत

विठ्ठल ममताबादे
उरण, दि. ७ :
सन २००६ मध्ये कामगार संघटनांच्या पाठपुराव्यामुळे स्थापन झालेल्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामुळे आजवर किमान दोन हजार स्थानिक तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर साडेतीन हजारांहून अधिक तरुण प्रतीक्षा यादीत आहेत. परंतु सध्या या मंडळाकडे पूर्णवेळ चेअरमन, सचिव अथवा पर्यवेक्षक नाही. सानपाडा कार्यालयातील अधिकाऱ्यांना तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे, पण ते देखील आठवड्यातून अधूनमधूनच उपस्थित राहतात. परिणामी, स्थानीय सुरक्षा रक्षकांना कोणताही स्थायिक आधार उरलेला नाही, आणि त्यांच्या तक्रारी अनुत्तरित राहतात.

या पार्श्वभूमीवर आता मंडळाचे बृहन्मुंबई-ठाणे बोर्डात विलीनीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असून, हे स्थानीय तरुणांच्या हक्कांवर अतिक्रमण करणारे षडयंत्र असल्याचे आरोप कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी ठणकावून मांडले आहेत. त्यांनी इशारा दिला की, जर हा विलीनीकरणाचा प्रस्ताव पुढे नेला गेला, तर मुंबई-ठाणे मंडळात बाहेरून लोक भरती होतील आणि रायगडच्या तरुणांना प्राधान्य मिळणार नाही.

शेलघर येथे सुरक्षा रक्षक व प्रतीक्षा यादीतील तरुणांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की, स्थानिक तरुणांच्या भविष्यासाठी वेळ आलीच तर सर्वपक्षीय लढा उभारण्यात येईल. त्यांच्या नोकरीवर गदा येवू दिली जाणार नाही आणि ही भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली. त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना या विषयाचे गांभीर्य ओळखून, स्थानिक तरुणांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!