सलीम शेख
माणगाव : माणगाव तालुक्यातील तिलोरे गावात दुर्दैवी दुर्घटनेमुळे एका शेतकऱ्याच्या आयुष्यात काळोख पसरला. शेतकरी संजय बबन बेंदुगडे यांच्या दोन बैलांना शेतीसाठी नांगरणी करत असताना विजेच्या खांबातील विद्युत प्रवाहाचा तीव्र झटका बसला, आणि घटनास्थळीच दोन्ही बैल ठार झाले. हि दुर्घटना भात लावणीच्या हंगामात घडल्याने बेंदुगडे कुटुंबावर मोठा आर्थिक व मानसिक आघात झाला.
ही बाब समजताच महाड-माणगाव-पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी अवघ्या २४ तासात तिलोरे येथे जाऊन शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी होत २५ हजार रुपये रोख मदत दिली. त्यांनी संबंधित वीज मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भरपाई प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ना. गोगावले यांच्या तत्परतेमुळे बेंदुगडे कुटुंबासह ग्रामस्थ भावनिक झाले.
विशेष म्हणजे तिलोरे गाव ना. गोगावले यांच्या मतदारसंघात नाही आणि शेतकरी त्यांच्या वैयक्तिक परिचयातही नव्हते. तरीही त्यांनी राजकारणापलीकडे जात फक्त माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे केला. शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा त्यांचा प्रयत्न समाजासाठी आदर्श ठरला असून ग्रामीण भागातील समस्यांबाबत त्यांची संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, तालुकाप्रमुख महेंद्र मानकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, विभागप्रमुख योगेश बक्कम, खरवली सरपंच संतोष खडतर, शाखाप्रमुख शैलेश जंगम, युवासेना विभागप्रमुख सुरज सांगले, आप्पा सांगले, अमित ढाकवळ, अनिल बेंदुगडे यांच्यासह तिलोरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.