शशिकांत मोरे
धाटाव : रोहा शहरातील ज्येष्ठ व्यावसायिक आणि प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले हर्षद मंगलदास शहा तथा मेहताजींचे शुक्रवारी रात्री वयाच्या ८३व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र शोककळा पसरली. अमेरिकेत असलेले त्यांचा मुलगा रोह्यात आल्यानंतर आज सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक त्यांच्या अंत्य यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
रोहा तालुक्यात गेली चार दशके स्थावर मालमत्ता, जमीन खरेदी, विक्री व्यवहारांचे मेहताजी हे नाव एक केंद्रबिंदू राहिले. या व्यवसायातले एक खात्रीशीर, प्रामाणिक आणि नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. अनेक तरुणांना त्यांनी या व्यवसायात आणले, त्यांना जवळ घेऊन मार्गदर्शन केले, अनेकांना त्यांनी मदत करून उभे केले. अत्यंत परोपकारी आणि धार्मिक असलेले मेहताजी हे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणूनही परिचित होते. शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा मिलन शहा, विपुल शहा, मुलगी मनिषा, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निवासस्थानावरून निघालेल्या अंत्ययात्रेत औद्योगिक, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठ्या संख्येने रोहेकर उपस्थित होते. रोहा वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मान्यवयांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच शहा कुटुंबियांचे सांत्वन केले. उद्या मंगळवार, दि. ८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता रोहा बाजारपेठेतील पोरवाल भवन येथे स्व. हर्षदभाई शहा तथा मेहताजी यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.