श्रीवर्धन : येथील महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयात, प्राचार्य डॉ. दत्तात्रया पांडुरंग राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीत तीन विद्यार्थिनींची नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्ती झाली आहे. कु. अमिषा बोरकर आणि कु. तानिया अडगावले यांची नियुक्ती महाराष्ट्र मिनिरल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक लेखा कार्यकारी पदावर झाली, तर कु. कामिनी चोगले हिला अक्षर माया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वेब डिझायनर म्हणून संधी मिळाली.

या विद्यार्थिनींचा सत्कार आणि मनोगतांचा कार्यक्रम महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र मिनिरल कॉर्पोरेशनचे रिझवान बाते आणि अक्षर माया प्रायव्हेट लिमिटेडचे आदित्य जयस्वाल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून कंपन्यांची माहिती दिली व महाविद्यालयातील विद्यार्थिनींना भविष्यात प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राणे यांनी सांगितले की, महाविद्यालय केवळ शैक्षणिक ज्ञान पुरविण्याचे काम करत नाही, तर प्रत्येक विद्यार्थिनीला पदवीप्राप्तीनंतर रोजगार अथवा व्यवसायासाठी सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जातो. उत्पन्नाचे साधन मिळवून देणे हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. सुमित चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहा. प्रा. ऋषिकेश चोगले यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
