मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आज गंभीर गोंधळ घडला, जेव्हा शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार वरुण सरदेसाई यांना विधानभवनाच्या पायऱ्यांवर जाताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकाकडून धक्का देण्यात आल्याचा आरोप झाला. यापूर्वीही अशा प्रकारची धक्काबुक्की झाल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.
वरुण सरदेसाई यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले, “आमच्या छातीवर आमदार असल्याचे बिल्ले लावले आहेत, तरीही आम्हाला कुणी ओळखत नाही, आम्ही काय करायचं?” अशी तीव्र नाराजी त्यांनी बोलून दाखवली.
सभागृहात वाद — गद्दारीच्या आरोपावरून वाकयुद्ध
विधानपरिषदेत मराठी माणसांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी कायदा करण्याची मागणी शिवसेना (UBT) चे आमदार अनिल परब यांनी सभागृहात केली. याला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका करत म्हटले, “शिवसेना UBTचे मराठी माणसावरील प्रेम हे ‘पुतना मावशी’सारखे आहे.” यावेळी परब यांनी “शंभूराज देसाई यांनी मराठी माणसांच्या मुद्यावर गद्दारी केली” असा उल्लेख केल्यानंतर सभागृहातील वातावरण तापलं. देसाई यांनी प्रत्युत्तरात परब यांच्यावर “तू गद्दार कोणाला बोलतोस? बाहेर ये, तुला दाखवतो! तू बूट चाटत होतास!” अशा शब्दांत हल्लाबोल केला.
विवाद वाढल्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विवादग्रस्त शब्द रेकॉर्डवरून हटवण्याच्या सूचना दिल्या, आणि त्वरित त्या अंमलात आणण्यात आल्या. या घडामोडींमुळे विधानभवनात वातावरण चांगलंच तापले असून सुरक्षा यंत्रणा आणि शिष्टाचारावरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
