मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यात जोरदार वाद झाला. मुंबईतील मराठी माणसांना घर मिळावीत या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना परब यांनी “मराठी माणसांसाठी कायदा करणार का?” असा सवाल उपस्थित केला. यावर देसाई यांनी “२०१९ ते २०२२ पर्यंत तुम्ही कायदा का केला नाही?” अशी प्रतिप्रश्न केला.
याच दरम्यान परब यांनी ‘गद्दार’ हा शब्द वापरला, ज्यामुळे सभागृहात वातावरण तापलं. देसाई यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली व परब यांना उद्देशून “तुम्ही त्यावेळी बूट चाटत होता” असे म्हणत परत सवाल केला. या वादामुळे विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी वादग्रस्त शब्द रेकॉर्डवरून हटवण्याचे आदेश दिले. शंभुराज देसाई यांनी नंतर स्पष्ट केलं की ते मिलिंद नार्वेकरांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. त्यांनी सांगितले की “२०२१ ते २०२२ या कालावधीत मराठी भाषिकांसाठी घर देण्यासंदर्भात कोणतेही धोरण नव्हते” आणि याच उत्तरामुळे परब यांना राग आला.
देसाई यांनी इशारा दिला की “जर हे प्रकरण वाढवलं गेलं, तर आम्हीही डबल करणार. आम्हीही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत.”
