मुंबई | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. युनेस्कोने महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील १ असे एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मान्यता दिली आहे. पॅरिस येथे झालेल्या निर्णायक मतदानात भारताच्या बाजूने बहुमत मिळाल्याने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
दीड वर्षांच्या प्रयत्नांना यश
या किल्ल्यांचे नामांकन सुमारे दीड वर्षांपूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत करण्यात आले होते. अखेर आज फ्रान्सच्या राजधानीत झालेल्या मतदानातून शिवरायांच्या दुर्गराज्याला जागतिक दर्जा मिळाला.
या किल्ल्यांचा समावेश
जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या किल्ल्यांमध्ये:
महाराष्ट्रातील : रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी
तामिळनाडूतील : जिंजी (गिंगी)
या सर्व किल्ल्यांचा स्वराज्य स्थापनेपासून संरक्षणापर्यंतचा इतिहास गौरवशाली असून, महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचे हे ठळक साक्षीदार आहेत.
शौर्याची आंतरराष्ट्रीय ओळख
शिवराय, शंभूराजे आणि त्यांच्या मावळ्यांनी ज्या दुर्गांवर जीवाचे रक्षण केले, ते आज जागतिक पातळीवर गौरवले जात आहेत. अनेक किल्ल्यांवर त्यांनी धोरणात्मक विजय मिळवले, अफजलखानाचा पराभव केला, नौदलाचा विस्तार केला — हे सारे इतिहास आता युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाल्यामुळे जगभर पोहोचणार आहे.
महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण
या ऐतिहासिक मान्यतेमुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी याला ‘स्वराज्याच्या गौरवाची आंतरराष्ट्रीय मोहर’ असे वर्णन केले आहे.
