मिलिंद माने
मुंबई, दि. १२ : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र येत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताच आता मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस राज ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन अज्ञात स्थळी जाणार असून तेथे मार्गदर्शन, रणनिती आखणी आणि निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील राजगड कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी
राज्य निवडणूक आयोग ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत अशा अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करत आहे. गणपतीपासून दसरा-दिवाळीपर्यंतची सणांची शृंखला संपताच निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन आणि मराठी मुद्द्यावरील युतीचे संकेत
वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी “मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत” असा संदेश दिला असून कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत स्पष्ट संकेत मिळत आहेत. युतीची भूमिका आणि बूथ स्तरावरील कार्यप्रणाली यावर राज ठाकरे दोन दिवस पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत.
बैठकीत काय होणार?
राज ठाकरे पदाधिकारी, विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुख यांना सोबत घेऊन खाजगी बसने अज्ञात स्थळी रवाना होणार आहेत. कोणत्या ठिकाणी जाणार हे गुप्त ठेवण्यात आले असून उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
राजकीय भूमिका आणि खर्च नियोजन
या बैठकीत शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट व शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्याबाबत मनसेची भूमिका काय असेल हे ठरवले जाणार आहे. तसेच निवडणुकीच्या खर्चाचे नियोजन, रिक्त पदांची भरती आणि कार्यकर्त्यांशी नव्याने संवाद यावरही चर्चा होईल.
माध्यमांपासून दूर, फक्त रणनीतीवर भर
ही बैठक मीडिया कवरेजपासून दूर ठेवण्यात येणार असून बुधवारी सकाळी पुन्हा मुंबईत परत येणार असल्याचे समजते.
राजकीय विश्लेषकांचा अंदाज
या दोन दिवसांच्या बैठकीनंतर मनसेच्या निवडणूक अभियानाला वेग येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्याच्या राजकारणात मनसे पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत या बैठकीतून मिळत आहेत.