मुंबई, ता. १४ : अलीकडच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भडकाऊ आणि द्वेषजन्य भाषणांमुळे महाराष्ट्रात सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप करत अॅड. पंकजकुमार मिश्रा, अॅड. नित्यानंद शर्मा आणि अॅड. आशीष राय यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. १४ जुलै रोजी पाठवलेल्या या पत्रात त्यांनी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिनांक ५ जुलै रोजी वरळी डोम येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी इतर राज्यांतून आलेल्या नागरिकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. भाषणादरम्यान, परप्रांतीयांविरोधात व्हिडिओ पुरावे न घेण्याचा सल्ला दिला होता. हे विधान गुन्हेगारी कृतीस प्रोत्साहन देणारे मानले जात असून, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा ठरते.
या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून इतर राज्यांतील नागरिकांवर मराठी भाषा बोलण्याची जबरदस्ती, शिवीगाळ, धमक्या व मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पत्रात नमूद आहे. यामुळे महाराष्ट्रातील शांतता आणि सामाजिक सौहार्द धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अर्जात भारतीय संविधानाच्या कलम १४, १९(१)(अ), १९(१)(ङ)(इ), २१ आणि २९ च्या उल्लंघनाचा उल्लेख करून, पुढील उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे:
- राज ठाकरे यांच्या भाषणावर गुन्हा दाखल करावा
- संबंधित मनसे कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी
- या घटनांवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA) अंतर्गत कारवाई करावी
- राज्यातील सर्व नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित करावेत
- विघटनकारी प्रवृत्तींविरोधात राज्य शासनाने स्पष्ट भूमिकेने जनतेसमोर निषेध व्यक्त करावा
या पत्रासह राज ठाकरे यांचे वादग्रस्त भाषण आणि मनसे कार्यकर्त्यांच्या हिंसक घटनांचे व्हिडिओ पुरावेही संलग्न करण्यात आले आहेत.