मुंबई : विधान परिषदेच्या सभागृहात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले, जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंना जाहीररित्या सत्तेत येण्याचा स्कोप असल्याचे सूचित केले. अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाल संपत आल्यानिमित्त आयोजित निरोप समारंभात फडणवीसांनी सभागृहात स्पष्टपणे म्हटले की, “आम्हाला २०२९ पर्यंत विरोधी पक्षात जाण्याची संधी नाही, पण उद्धवजी तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे… त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल.”
सभागृहाबाहेरील भेट, सभागृहातील ऑफर
या आधी फडणवीस आणि ठाकरे यांच्यात सभागृहाबाहेरही अनौपचारिक भेट झाली होती. त्याच अनुषंगाने सभागृहात केलेल्या जाहीर वक्तव्यामुळे राजकीय रंगत वाढली असून, सत्ताधारी भाजप-शिंदे युती आणि ठाकरे गटामध्ये समीकरण बदलण्याच्या चर्चेला प्रारंभ झाला आहे.
अंबादास दानवे कट्टर सावरकरवादी
फडणवीसांनी विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांचा उल्लेख करत त्यांना “हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा, भाजपच्या मुशीत घडलेला, कट्टर सावरकरवादी कार्यकर्ता” असे संबोधले. त्यांनी याच व्यक्तिमत्त्वाचा आधार घेत विधानपरिषदेच्या जागा वाटपात दानवे शिवसेनेत गेले, हे सांगितले.
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
या भाषणाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अंबादास दानवे हे भाजप आणि संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आम्हाला मिळाले, त्याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानतो. मात्र, ज्या नेत्यांना त्यांनी आमच्याकडून घेतले, त्याबद्दल ते माझे आभार मानतील की नाही, याबाबत मला शंका आहे.”
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकोय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-ठाकरे युती शक्य आहे का, या प्रश्नाने सत्ताकारणाचे वळण पकडले आहे.
