इगतपुरी, ता. १४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोबत संभाव्य युतीबाबत अनौपचारिक चर्चेत महत्त्वाचे विधान करत, युतीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. “विजयी मेळावा हा मराठीसाठी आहे, त्याचा राजकारणाशी संबंध नाही,” असे सांगून त्यांनी युतीबाबतची भूमिका खुली ठेवली.
नाशिकच्या इगतपुरीत तीन दिवशीय कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले असून, राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले की, नोव्हेंबर–डिसेंबरदरम्यानच्या परिस्थितीचा आढावा घेऊन युतीबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) गटाकडून युतीबाबत उत्सुकता कायम असली तरी स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले जात आहे.
महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहे. मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले. पण युतीसंदर्भात मनसेच्या वक्त्यांनी माध्यमांशी बोलू नये, असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. त्याचबरोबर बाळा नांदगावकर यांनीही त्याचपद्धतीचे विधान केलंय. याआधीही एकटे लढलो आहोत, आता पुढे वेळ आली तरी एकटे लढू असं विधान बाळा नांदगावकर यांनी केलंय. दरम्यान युती संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नको ,असं सामना या मूखपत्रातून सांगण्यात आलंय.
मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले. ते राजकीयदृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे. दिल्ली, महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील. ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना आहे, असंही सामनामध्ये म्हटलंय. आता संभ्रम नको, असं आवाहन रोखठोकद्वारे करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांआधी मनसेमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवर भाष्य करू नये, असे आदेश दिलेत. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झालाय. आता राज ठाकरेंनी इगतपुरीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. युतीचा निर्णय नंतर घेऊ असं राज ठाकरे म्हणालेत.
