• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार, परिवहनमंत्र्यांची घोषणा

ByEditor

Jul 15, 2025

मुंबई, ता. १५ जुलै — येत्या २७ ऑगस्ट रोजी गणरायाच्या आगमनानिमित्त कोकणात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून, मुंबई, ठाणे आणि पालघरहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा ५००० जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील बैठकीत ही माहिती दिली. बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, “गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा सण असून, बाप्पा आणि एसटी यांचं अतूट नातं आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी नफा-तोट्याचा विचार न करता चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी वाहतूक राबवते.”

या विशेष सेवा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान उपलब्ध असतील. प्रवाशांना आरक्षणासाठी npublic.msrtcors.com संकेतस्थळावर तसेच MSRTC Bus Reservation ॲप आणि बसस्थानकांवर सुविधा दिली जाईल.

याआधी आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटीने ५२०० जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या आणि प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे गणेशोत्सवासाठीही विशेष वाहतूक सुनिश्चित केली जात आहे.

२२ जुलैपासून गट आरक्षण सेवा सुरू होत असून, अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत तसेच सामान्य ज्येष्ठ नागरिक व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे.

गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी म्हणून बसस्थानकांवर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार असून, कोकणातील महामार्गांवर वाहनदुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!