कोल्हाण (पालघर): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानात न अडकवता त्यांना व्यावहारिक जगाची ओळख व्हावी, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषद शाळा, कोल्हाण येथे ‘खाऊ जत्रेचे’ अनोखे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल्स मांडून दोन ते तीन हजार रुपयांची आर्थिक उलाढाल करत प्रत्यक्ष व्यवहारातील गणिताचे धडे गिरवले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. आव्हाड सर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे प्रास्ताविक करताना त्यांनी सांगितले की, “बाजारातील व्यवहार, नोटा-नाण्यांची ओळख आणि बेरीज-वजाबाकी यांसारखी गणिती कौशल्ये प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावीत, हा या जत्रेमागचा मुख्य हेतू आहे.”

या उपक्रमाचे उद्घाटन श्री. नथुराम गवाने यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) अध्यक्षा सौ. शालिनी वाढवळ, उपाध्यक्षा सौ. रंजिता वाढवळ यांच्यासह गावातील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत त्यांचा उत्साह द्विगुणित केला.
विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने खाद्यपदार्थांची विक्री केली. अवघ्या काही तासांत झालेल्या २ ते ३ हजार रुपयांच्या उलाढालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका दर्शना माळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच श्री. विश्वास सुतार, श्री. विनोद गवाने, श्री. अरुण वाढवळ आणि सर्व पालकांनी मोलाचे सहकार्य केले. शिक्षणासोबतच आनंद देणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कोल्हाण परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
