पुणे | विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत विसंवाद गडद झाला आहे. पक्षाच्या नवनियुक्त अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या संघटनात्मक पदांचा उल्लेख टाळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे आणि पदांना फाटा
२६ फेब्रुवारी रोजी पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी १० मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. या पत्रासोबत त्यांनी १४ पदाधिकाऱ्यांची यादी जोडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यात स्वतः सुनेत्रा पवार (अध्यक्ष) आणि शिवाजीराव गर्जे (खजिनदार) यांच्या नावापुढे पदांचा उल्लेख आहे; मात्र प्रफुल्ल पटेल (राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष), सुनील तटकरे (प्रदेशाध्यक्ष), छगन भुजबल आणि जय पवार यांच्या नावांसमोर कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
याच पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, २८ जानेवारी (अजित पवार यांचे निधन) ते २६ फेब्रुवारी (सुनेत्रा पवार यांची निवड) या दरम्यान पक्षाच्या नावाने आयोगाला दिलेली कोणतीही माहिती किंवा संदेश अधिकृत मानला जाऊ नये. या भूमिकेमुळे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वात ताणतणाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
नेतृत्वशैलीवर प्रश्नचिन्ह?
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून सार्वजनिक आणि राजकीय सक्रियता कमी ठेवली आहे. महत्त्वाचे संघटनात्मक निर्णय प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेच घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना बाजूला सारल्याचे आरोप फेटाळून लावत पवार कुटुंबाशी निष्ठा कायम असल्याचे म्हटले आहे.
विलीनीकरणाच्या चर्चेवरून खडाजंगी
दुसरीकडे, शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील विलीनीकरणाच्या चर्चेवरून पुन्हा वाद उफाळला आहे. सुनील तटकरे यांनी प्रथमच कबुली दिली की, अजित पवार हयात असताना विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. मात्र, शरद पवार गटाकडून याला ‘अजितदादांची शेवटची इच्छा’ असे संबोधले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “ज्यांनी दादांच्या राजकीय कारकीर्दीवर टीका केली, तेच आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी तोफ तटकरे यांनी डागली.
पक्षापुढील आव्हाने वाढली
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकापाठोपाठ एक वादात अडकत आहे. रुपाली चाकणकर यांची व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप आणि नेत्यांमधील विसंवाद यामुळे पक्षाची प्रतिमा सावरण्याचे मोठे आव्हान आता सुनेत्रा पवार यांच्यासमोर आहे. बुधवारी सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्या असून, एनडीएच्या प्रमुख नेत्यांशी होणाऱ्या भेटीत त्या काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
