पुणे/बारामती: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. राज्याच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत सुनेत्रा वहिनींनी तब्बल २,१८,९३० मतांच्या प्रचंड फरकाने दणदणीत विजय संपादन केला. या विजयामुळे बारामतीवरील पवार कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
अजितदादांचाही विक्रम मोडीत
बारामती हा पवार कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. यापूर्वी अजित पवार यांनी याच मतदारसंघातून १ लाख ६५ हजार मताधिक्यांचा विक्रमी विजय मिळवला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी आजच्या निकालात हा आकडाही मागे टाकला. पोटनिवडणुकीच्या इतिहासात २ लाखांहून अधिक मताधिक्य घेणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे.
राहुरीतही भाजपचा झेंडा; अक्षय कर्डिले विजयी
बारामतीसोबतच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही आज जाहीर झाला. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा यशस्वीपणे पुढे चालवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. राहुरीच्या मतदारांनी कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवल्याने या मतदारसंघात पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलले आहे.
नव्या पर्वाची सुरुवात
सुनेत्रा पवार यांच्या या ऐतिहासिक विजयाने बारामतीच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. २ लाखांहून अधिक मताधिक्य ही केवळ लाट नसून जनतेने सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर दिलेली ही मोठी पावती आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
