• Wed. Apr 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

UBT मध्ये मोठा उलटफेर! उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे रिंगणात; आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी घोषित

ByEditor

Apr 29, 2026

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली.

नेमका ‘ट्विस्ट’ काय?

​गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच विधानपरिषदेचे उमेदवार असतील, असे मानले जात होते. खुद्द अंबादास दानवे यांनीही काही दिवसांपूर्वी ठाकरे यांचे नाव अंतिम असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. मात्र, ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

​संजय राऊत यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत माहिती दिली की, “अंबादास दानवे हे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. गुरुवारी सकाळी ११ वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.”

शिंदेंची ‘दहाव्या’ उमेदवाराची खेळी?

​दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत मोठी रणनीती आखल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी मतदान होणार असताना शिंदे गट १० वा उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या १० व्या उमेदवारासाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या मतांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू असून, याचा फटका उद्धव ठाकरे गटाला बसू शकतो, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.

विधानसभेतील संख्याबळ आणि गणिते

​विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येकी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. सध्याच्या संख्याबळानुसार चित्र खालीलप्रमाणे आहे:

  • महायुती (एकूण २३४ मते): भाजपकडे १३१, शिंदेंची शिवसेना ५७, आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ४० तसेच मित्रपक्ष व अपक्षांच्या जोरावर महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
  • महाविकास आघाडी (एकूण ४९ मते): ठाकरे गट २०, काँग्रेस १६, आणि शरद पवार गट १० अशी आघाडीची मते आहेत. या बळावर मविआचा एक उमेदवार (अंबादास दानवे) सुरक्षित मानला जात आहे.

भाजपकडून ५ उमेदवारांची घोषणा

​भारतीय जनता पक्षाने आधीच आपले पत्ते खुले केले असून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

​आता अंबादास दानवे यांची उमेदवारी आणि एकनाथ शिंदेंची संभाव्य ‘दहाव्या उमेदवाराची’ खेळी यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!