मुंबई: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगडाचे सेवन केल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक पोस्टमार्टेम रिपोर्टमधून या मृत्यूंमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे (Food Poisoning) या चौघांच्याही किडन्या निकामी झाल्याचे संकेत वैद्यकीय अहवालातून मिळाले आहेत.
पायधुनी येथील दोकाडिया कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली. २५ एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या सुमारास अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि दोन मुली आएशा व जेनब यांच्यासह कुटुंबातील ९ सदस्यांनी एकत्र बसून बिर्याणीचे जेवण केले होते. जेवणानंतर इतर नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. मात्र, रात्री दीड वाजेच्या सुमारास या चौघांनी पुन्हा कलिंगड खाल्ले. पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास या सर्वांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुरुवातीला बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्याने हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोस्टमार्टेमच्या प्राथमिक अहवालानुसार, तीव्र अन्न विषबाधेमुळे या चौघांच्याही किडनीवर मोठा परिणाम झाला आणि किडनी निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेण्यासाठी व्हिसेरा नमुने राखून ठेवण्यात आले आहेत. आता हिस्टोपॉथोलॉजिकल रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि तांत्रिक कारण स्पष्ट होणार आहे. पायधुनी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
