मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होत असून, महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला केवळ एक जागा आली असून, या एका जागेसाठी तब्बल सात जण इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपले चिरंजीव अनिकेत तटकरे यांना पुन्हा आमदार करण्यासाठी कंबर कसली असून, त्याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी खलबतं केल्याची माहिती समोर येत आहे.
अनिकेत तटकरे यांनी २०१८ ते २०२४ या काळात रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपत असल्याने सध्या ती जागा रिक्त होत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा आमदार करण्यासाठी नेत्यांपुढे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे त्यांना पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून संधी देणे किंवा सध्या रिक्त होत असलेल्या विधान परिषदेच्या जागेवर त्यांची वर्णी लावणे. मात्र, अनिकेत तटकरेंना उमेदवारी दिल्यास पक्षाला ‘घराणेशाही’च्या आरोपांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण तटकरे कुटुंबात सुनील तटकरे स्वतः खासदार आहेत, तर त्यांची कन्या अदिती तटकरे या राज्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत. एकाच घरात तीन पदे दिल्यास पक्षात नाराजी नाट्य उभे राहू शकते, असा एक मतप्रवाह आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीतील या एकमेव जागेसाठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावासाठी आग्रह धरला आहे, तर दुसरीकडे निवृत्त होत असलेले अमोल मिटकरी पुन्हा संधी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. या शर्यतीत माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रवक्ते आनंद परांजपे आणि उमेश पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार हे घराणेशाहीचा आरोप टाळून अनिकेत तटकरेंसाठी कोणता मार्ग निवडणार की इतर इच्छुकांपैकी कोणाला संधी देणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
